राहाता : गुणवत्तापूर्ण सेवा तसेच विधायक उपक्रमांमध्ये आघाडीवर असलेल्या राहाता पंचायत समितीला नुकतेच आयएसओ ९००१-२०१५ मानांकन बहाल करण्यात आले. आयएसओ मानांकन मिळवणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या पंचायत समितीचा मान राहात्याला मिळाला आहे़पंचायत समितीला राज्यपातळीवरील यशवंतराज पंचायत अभियानात यापूर्वी वेळोवेळी पुरस्कार मिळाले असून आता आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याने कार्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे़ केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, अंतरविभागिय समन्वय, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर पंचायत समितीने विशेष लक्ष केंद्रित केले होते.सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी व पशुसंवर्धन, समाजकल्याण, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार स्वच्छता व पाणी पुरवठा, डीआरडीए आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल या मानांकनावेळी घेण्यात आली. पंचायत समिती कार्यालयातील अद्ययावत अभिलेख कक्ष, सौरऊर्जेचा वापर, सीसीटीव्ही कॅमेराद्वारे निगराणी या बाबींमुळे पंचायत समितीचे वेगळेपण आयएसओ मानांकनामुळे अधोरेखित झाले आहे, असे सभापती हिराबाई कातोरे यांनी सांगितले़ या मानांकनासाठी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ़ सुजय विखे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह सभापती, उपसभापती व सदस्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले, असे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले़गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पंचायत समितीच्या सभापती हिराबाई कतोरे यांनी पुरस्कार स्वीकारला़ यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष बाबासाहेब आहेर, शिर्डी नगरपालिका नगराध्यक्षा अर्चना कोते, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, गणेश कारखाना अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ आदी उपस्थित होते.
राहाता पंचायत समितीला आयएसओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 4:00 PM