प्रमोद आहेर । शिर्डी : ‘साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल’ असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला.‘ऋषींचे कुळ आणि नदीचं मूळ’ शोधू नये म्हणतात़ साईबाबांनी आपल्या हयातीत भक्तांनी अनेकदा विचारूनही आपले नाव, जात, धर्म कधीही उघड केला नाही़. भविष्यात जात, धर्मच माणुसकीचे मोठे अडसर ठरतील हे त्यांना माहीत असेल. हिंदू त्यांना ‘संत ’तर मुस्लिम त्यांना ‘पीर’ समजत़ म्हाळसापतींनी आगमन प्रसंगी दिलेले नावच त्यांनी अंगीकारले. धुळे कोर्टातील एका खटल्यात कमिशनवर साक्ष देतांना साईबाबांनी आपला पंथ किंवा धर्म ‘कबीर’ (हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले संत) आणि जात ‘परवरदिगार’ ( अल्ला किंवा ईश्वर) असल्याचे सांगितले होते. जात, धर्म माहीत नसल्याने साईबाबा जगभरातील भाविकांसाठी सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहेत. दाभोळकर लिखित मूळ चरित्रही हेच सांगते. जन्मस्थळाबाबत स्पष्टीकरणसंत दासगणू लिखित सेलुच्या केशवराज बाबासाहेब महाराजांच्या चरित्रात साईबाबा पाथरीला जन्मल्याचा व बाबासाहेब उर्फ गोपाळराव साईबाबांचे गुरू असल्याचा उल्लेख आहे. हाच धागा पकडून १९७५ च्या सुमारास विश्वास खेरांनी साईबाबांचे नाव हरिभाऊ भुसारी असून ब्राम्हण कुटुंबात जन्मल्याचा तर्क लावला. मात्र मधील दोन पिढ्यांची माहिती मिळाली नसल्याने तेही साशंक होते. वास्तविक गोपाळराव महाराजांचे निर्वाण मंगळवार, १५ डिसेंबर १८०१ रोजी साईबाबांच्या जन्माच्या आधीच झाले.बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम येथे झाल्याचे सांगतात. एका तमिळ चरित्रात साठेशास्त्री व लक्ष्मीबाईच्या पोटी साईबाबा जन्मल्याचा उल्लेख आहे. गुजराती साईसुधा बाबांचा जन्म ११ आॅगस्ट १८५८ रोजी गुजराती ब्राम्हण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जेरुसलेमच्या जाफा दरवाजात झाल्याचा व तेथून ते पाथरीला गेल्याचे सांगते. मंगळवेढ्यात एक दिंगबर नावाचे बुवा होते. तेच साईबाबा असल्याचीही चर्चा त्यावेळी होती़.साई शरणानंद लिखित चरित्रात बाबांचा जन्म पाथरीला गंगाभव व देवगिरी अम्मा यांच्या पोटी झाला आहे. साईबाबा १८५७ च्या बंडानंतर परागंदा झालेले नानासाहेब पेशवे असावेत, असाही संशय व्यक्त झाला. शिर्डीत आलेल्या पाथरीच्या माणसाकडे बाबांनी तिकडची माहिती विचारली याचा अर्थ त्यांना पाथरीची माहिती होती. मात्र ते पाथरीचेच असे म्हणणे धाडसाचे ठरेल. ब्रिटिशांनाही याबाबत शोध घेता आला नाही. त्यांचे कुणी नातेवाईकही फिरकले नाहीत. एकूणच जन्मस्थानाचे व आई-वडिलांबाबतचे दावे तर्कावर आधारित आहेत. अनेक महात्म्ये, संत जातीचे लेबल लावल्याने मर्यादित झाले. साईबाबांनाही तथाकथित जन्मस्थानाच्या माध्यमातून जाती, धर्माचे लेबल लागणे मानवतेच्या हिताचे नाही.साईबाबांनी गोपनीय ठेवलेल्या बाबींवर भाष्य करणे साईबाबांवर अन्याय करणारे व करोडो भाविकांच्या श्रद्धा दुखावणारे ठरेल. पाथरीच्या साईमंदिराचा विकास झाला तर आनंदच आहे. मात्र तथाकथित जन्मस्थानाच्या ओळखीतून साईबाबांची सर्वधर्म समभावाची ओळख पुसायला नको, असे साईभक्तांचे म्हणणे आहे.
साईबाबांच्या जन्मस्थानाचा मुद्दा; नव्या वादाला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 1:02 PM