सत्तार शेख
हळगाव (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील चौंडी येथून वाहणाऱ्या सीना नदीकाठी वसलेल्या आदिवासी भिल्ल समूहाला जातीचे दाखले मिळावेत यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतर भिल्ल समाजाच्या कुटुंबाला जातीचे दाखले मिळाल्याने कुटुंबाच्याही आनंदाला पारावार राहिला नाही.
आदिवासी भिल्ल समाजातील सात जणांना सोमवारी थेट पालांवर जाऊन जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. जात प्रमाणपत्र हाती पडताच पालावरच्या बाया-बापड्यांचे चेहरे आनंदून गेले. चापडगाव (ता.कर्जत) येथील रहिवासी असलेले आदिवासी भिल्ल समाजातील एक छोटसे कुटुंब आहे. स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतर एका कुटुंबाचा विस्तार ९० लोकांपर्यंत झाला. त्यामध्ये ६० च्या आसपास प्रौढ व्यक्ती आणि २५ ते ३० लहान मुलांचा समावेश आहे.