श्रीरामपूर : शहरात जनावरे घेऊन जाणारे दोन टेम्पो काही कार्यकर्त्यांनी अडविले व पोलीस ठाण्यात नेले. मात्र, हा प्रकार कार्यकर्त्यांच्या चांगलाच अंगलट आला. ही जनावरे कत्तलखान्यात नाही तर ऊसतोडणी मजुरांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे टेम्पो अडविणाऱ्या कार्यकर्त्यांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
या कार्यकर्त्यांमध्ये कुणाल करंडे, किशन ताकटे, उज्ज्वल ताकटे या तिघांचा समावेश आहे. हवालदार पंकज गोसावी यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे. लोणी येथून वैजापूर तालुक्यातील वक्ती पानवी व अशोकनगर येथे जनावरे घेऊन हे टेम्पो जात होते. एका टेम्पोत ऊसतोड मजुराची जनावरे होती तर दुसरे वाहन विकली न गेलेली जनावरे परत घेऊन चालला होता. मात्र, शहरातील शिवाजी चौकात कुणाल करंडे, किशन ताकटे व भारत ताकटे व अन्य तीन युवकांनी हे जनावरे कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचा आरोप करीत टेम्पो अडविला व नंतर पोलीस ठाण्यात नेले. विनाकारण चौकशी न करता अडवणूक केल्याने या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.