'त्या' दिवट्याचं धोतर फेडायला वेळ लागणार नाही; अजित पवारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:28 PM2019-09-23T16:28:09+5:302019-09-23T16:31:25+5:30
सरकारने पाच वर्षात अडीच लाख कोटी कर्ज काढले. हा पैसा गेला कुठे?
अकोले : राष्ट्रवादीने अकोलेला भरभरुन दिले आहे. पाण्याचे प्रश्न सोडविले. निळवंडे धरण पूर्णत्वास येण्यासाठी काम केले. विशेष बाब म्हणून पिंपळगाव खांड पूर्ण केले. जिल्हा बँकेच अध्यक्षपद दिले. जिल्हा परिषदेत महत्वाचे खाते दिले. पण दिवट्यांनी काळा चष्मा काढला आणि त्यांची काळी बाजू समोर दिसू लागल्याने त्यांनी पक्ष सोडला. त्यांचे धोतरं फेडायला वेळ लागणार नाही? असा इशारा पवार यांनी अप्रत्यक्षपणे आमदार वैभव पिचड यांना दिला.
अकोले बाजारतळावर सोमवारी झालेल्या सभेत पवार बोलत होते. स्वत:च्या चुकांवर पांघरुन घालण्यासाठी त्यांनी पक्ष बदलला. मात्र अकोलेची जनता राष्ट्रवादीबरोबरच आहे. तालुक्यात आघाडी सरकारने अनेक विकास कामे केली आहेत. राज्यात पुन्हा सत्तेवर येताच शेतक-यांचा सातबारा कोरा करु, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात आरोग्य व शिक्षण याच्या सुविधा नाहीत. औद्योगिक वसाहत नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. येथील नेतृत्वाने सहकारी संस्थांचा उपयोग स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी केला. भाजपची सत्तेची मस्ती जिरवण्यासाठी युवकांनी कंबर कसावी.
सरकारने पाच वर्षात अडीच लाख कोटी कर्ज काढले. हा पैसा गेला कुठे? असा सवाल करीत भाजप सरकार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले असते तर त्यांच्यावर शेतक-यांच्या मुलीने शाई फेकली नसती. शेतक-यांच्या मुलांनी त्यांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवले नसते अशी टीका करीत भाजपच्या फसव्या जाहिरातींना बळी पडू नका? असे आवाहन पवार यांनी केले.