राहुरी : येत्या तीन दिवसात अहमदनगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान विभागाचे सहयोगी प्राध्यापक रवींद्र आंधळे यांनी शुक्रवारी (२६ जून) ‘लोकमत'शी बोलताना सांगितले.
शुक्रवार ते शनिवार यादरम्यान वादळी वा-यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. वा-याचा ताशी वेग ३० किलोमीटर राहील. रविवार आणि सोमवार हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. विजेचा कडकडाटाची शक्यता लक्षात घेता झाडाखाली कोणीही थांबू नये.
पश्चिम महाराष्ट्रात कोकण ते धुळे नंदुरबारपर्यंत पावसाची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी १७० मिलिमीटर पाऊस पडला आहे.
खरिपाच्या पेरणीसाठी शंभर मिलिमीटर पावसाची गरज असते. पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतक-यांनी जून अखेर पेरण्या करून घ्याव्यात, असेही आंधळे यांनी सांगितले.