लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमधून बाजारपेठ सावरते न सावरते तेच राज्य सरकारने नुकताच पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे छोटे-मोठे व्यवसाय असणाऱ्या व्यावसायिकांच्या कुटुंबीयांना प्रपंचाचा गाडा चालविताना तसेच कर्जाचे हप्ते भरताना मोठी कसरत करावी लागत आहे. आतातर गृहिणींना गळ्यातली चेन मोडायची वेळ आली आहे. त्यामुळे कसले ब्रेक द चेन ? असा सवाल घर चालविणाऱ्या महिलांनी उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात १९ मार्चपासून १०० टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामध्ये अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्वच बाजारपेठ पूर्णतः बंद करण्यात आली होती. त्यामुळे सुमारे ९० दिवस जिल्ह्यातील बाजारपेठा बंद राहिल्या होत्या. यादरम्यान दैनंदिन व्यवसायावर अवलबून असणाऱ्या असंख्य व्यावसायिकांना स्वतःच्या घरातील खासकरून महिलांच्याजवळ असलेले दागिने मोडून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवावा लागला. यावर्षी जानेवारीपासून बाजारपेठ सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती. त्यातच एप्रिलमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे सर्वाचेच आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
.............
दोनच महिने सुरू राहिला व्यवसाय, आता कर्ज कसे फेडायचे ?
राज्य शासनाने पुन्हा ६ ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. या बे भरवश्याच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे रोजचे उत्पन्न शून्यावर आले आहे. त्यातच महागाईच्या भडक्यात प्रपंच चालविण्याबरोबरच व्यवसायासाठी, घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, घराचे, दुकांनाचे भाडे, वीजबिल यांसह अनेक आर्थिक जबाबदाऱ्या आता मात्र कशा पार पाडायच्या याच विवंचणेने व्यावसायिकांसह त्यांच्या घरातील महिलांना ग्रासले आहे.
..........
२०० पेक्षा जास्त दिवस जिल्ह्यात सुरू राहिली दुकाने.
* लॉकडाऊननंतर बाजारपेठेतील बंद ठेवण्यात आलेली दुकाने वेळेचे बंधन पाळून उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. लॉकडाऊन करतेवेळी दुकानात असलेल्या उपलब्ध मालाची महिनाभर विक्री झाली.
* त्यानंतर दुकानदारांना बाजारपेठेत मालच उपलब्ध होत नव्हता. झालाच तर थोडक्याप्रमाणात आणि किमती वाढलेला माल खरेदी करावा लागला.
* दिवाळीचा सनदेखील निराशामय गेला, हीच परिस्थिती डिसेंबरपर्यंत कायम राहील.
* त्यामुळे कोणत्याच प्रकारे आर्थिक घडी बसलीच नसल्याने गेले वर्ष हे पूर्णतः क्लेशदायक ठरले.
.............
सततच्या लॉकडाऊनमुळे तणाव वाढतोय..
आमचे कटलरी व फोटोग्राफीचे दुकान आहे. लॉकडाऊनमुळे पूर्णतः आर्थिक आवक बंद झाली. परंतु खर्च थांबलेला नाही. तसेच उद्योगधंद्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्तेदेखील सुरूच आहे, बँकांचे हप्ते कसे भरावे, घर खर्च कसा भागवायचा, मुलांच्या शाळेची फी कोठून भरायची, आजारपणात औषधांसाठी पैसा कोठून आणायचा, वीजबिल असे एकनाअनेक प्रश्न समोर येत आहेत.
- अनिता भवर, गृहिणी
....
चहाची टपरी आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत चहा विकूनच मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा चरितार्थ चालतो. लॉकडाऊनमुळे पैशांची आवक पूर्णतः बंद झाली आहे. खर्च थांबलेला नाही. त्यातच तीन मुलांच्या शिक्षणासह खासगी शिकवणीचे ऑनलाइन वर्ग सुरू आहे. त्याची फी भरण्यासाठीदेखील पैसे नाहीत. त्यामुळे गळ्यातील सोन्याची पोत गहाण ठेवावी लागणार आहे.
- सविता चव्हाण, गृहिणी
.........
मी एक वयस्कर महिला आहे. माझ्या मुलाचे भाडोत्री जागेत कपडे इस्तरीचे दुकान आहे. त्यावरच आमच्या कुटुंबाची चूल चालते. परंतु, या लॉकडाऊनमुळे आता कुटुंब चालवायचे कसे ? जगायचे कसे ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- निर्मला गवळी, गृहिणी
........
सुपारी विक्रीचे दुकान आहे. तसेच कुटुंब मोठे आहे. या व्यवसायावरच कुटुंबाची गुजराण होते. मात्र, पुन्हा लॉकडाऊन झाल्याने उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.
- अंजुम मन्सुरी, गृहिणी
...........