योगेश गुंडअहमदनगर : फक्त आठ गुंठे जमीन.. त्यात दुष्काळ पाचवीला पूजलेला.. पोटी मूलबाळ नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी तीन-चार शेळ्या व एक गावरान गाय. आपले म्हणणारे जवळपास कोणीच नसल्याने एकमेकांच्या सुखदु:खात एकमेकांना आधार देणारे शंकर सोनू जाधव.गावात ते आप्पा या नावानेच परिचित. आप्पा व त्यांची पत्नी मोठ्याईचे चास येथील जि.प. वस्ती शाळेजवळ रहाणारे छोटेखानी कुटुंब. पण सुखी संसारात विघ्नांचे विरजण न पडल्यास ती नियती कसली. अशातच उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेल्या आप्पांच्या शेळ्या चोरीला जातात अन आप्पांवर संकटांचा डोंगर कोसळला. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन चोरीला गेल्यामुळे कुटुंब चालायचे कसे, खायचे काय हा यक्षप्रश्न आप्पांना पडला. आप्पा शाळेच्या शेजारीच रहायला असल्याने बोलताबोलता चोरीची घटना वाºयासारखी विद्यार्थ्यांमार्फ त शाळेतील शिक्षक बी. के. बनकर यांच्यापर्यंत गेली. शिक्षकी बाण्यातील मनाची संवेदनशीलता दाखवत बनकर गुरूजींनी आप्पांची आपुलकीने विचारपूस केली. विद्यालयातील शिक्षक बनकर यांनी शाळा व विद्यार्थ्यांना हाताशी धरत आप्पांप्रती काही तरी उतराई होण्याचे ठरवले. यासाठी निरागस चिमुकल्यांनीही मदतीचे हात पुढे केले. कुणी आठवाभर, कुणी अदुलीभर तर कुणी पायलीभर धान्य आप्पांसाठी आणले. चिमुकल्यांचा हा उत्साह पाहून शाळेतील शिक्षकांनीही त्यांना किराणा सामान आणले. दुसºया दिवशी आप्पांना बोलावून त्यांना ही मदत देण्यात आली. निरागस इवल्याशा हातांची मदत पाहून आप्पांचे डोळे पाणावले. थरथरत्या हातांनी ती मदत आपल्या ओंजळीत घेताना कुटुंब गहिवरले. चोरीमुळे खायचे वांधे झालेले आप्पांचे कुटुंब विद्यार्थ्यांच्या, शाळेच्या मदतीमुळे सावरले. बालमनाला एक चांगला व संस्कारक्षम अनुभव शिक्षक बनकर व शिक्षिका रंजना चेमटे यांना मिळाला. शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर व शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी शाळा व मुलांच्या सहृदयतेचे कौतुक केले .दुष्काळात चोरी झाली. चोरांनी पण चोरी कुणाची करावी आम्हा गरिबांची. वस्तीवर राहायला आहे. बायकोला चालता येत नाही. त्यामुळे सर्व कामे मलाच या वयात करावी लागतात, कुणीही आधार नाही. मुलांची मदत लाखमोलाची आहे, असे शंकर सोनू जाधव यांनी सांगितले.
इवल्याशा हातांनी सावरला 'त्यांचा' फाटका संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 3:57 PM