अहमदनगर : नागपूर येथून सुरू झालेली परिवर्तन यात्रा मुंबई येथे पोलीस प्रशासनाने अडविल्याच्या निषेधार्थ अहमदनगर येथे सोमवारी रात्री बहुजन मुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे निदर्शने करत जेलभरो आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना अटक करून कोतवाली पोलीस ठाण्यात नेले व नंतर रात्री उशिरा सोडून देण्यात आले.बहुजन समाजात जागृती करण्यासाठी संविधानिक मार्गाने दि. २४ एप्रिल रोजी नागपूर येथून ही परिवर्तन यात्रा निघाली आहे. २७ दिवस यात्रा सुरळीतपणे सुरू होती, परंतु यात्रा मुंबईत दाखल होताच पोलिसांनी अडविली. प्रशासनाने फडणवीस सरकारच्या सांगण्यावरून ही यात्रा अडवल्याची चर्चा यात्रेत सहभागी लोकांकडून होत आहे. पोलिसांच्या या आडमुठ्या धोरणांमुळे आमच्या मूलभूत अधिकारांचे हनन झाले असून, शासन यातून काय साध्य करूइच्छिते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध म्हणून माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बहुजन क्रांती मोर्चात सहभागी भारत मुक्ती मोर्चा, बामसेफ, लोकशाही विचारमंच, इम्पा, भारतीय विद्यार्थी मोर्चा, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, तसेच बहुजन मुक्ती पक्षाचे असंख्य कार्यकर्ते जमा झाले. राष्ट्रपुरुषांच्या विजयाच्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता. महाराष्ट्र शासनाच्या धिक्काराच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.याप्रसंगी राजेंद्र करंदीकर, संजय संसारे, संतोष वाघमारे, अशोक गायकवाड, धनराज चंडाले, सोमा शिंदे, रवींद्र साळवे, विशाल चव्हाण, सागर सोनवणे, किरण सोनवणे, बाळासाहेब जाधव, फिरोज शेख, अब्दुल आतार, भास्कर रन्नवरे, सूर्यकांत गायकवाड, विमल किसकू आदी उपस्थित होते. शहर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त तैनात केला होता.