केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासार ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पद रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश नाशिक विभागीय आयुक्तांनी कायम ठेवला. त्यामुळे सरपंचपदाचा प्रभारी पदभार उपसरपंच जयप्रकाश कडुस पाटील यांनी नुकताच स्वीकारला.
सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याने सरपंच आरती कडुस यांचे पद जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी २२ जानेवारी २०२१ रोजी रद्द केले होते. नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी ५ मे रोजी दिलेल्या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला. त्यामुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांनी सरपंचपदाचा प्रभारी पदभार उपसरपंच जयप्रकाश कडुस यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी एस. के. कसबे यांनी शुक्रवारी (दि.२८) पदभाराचे पत्र कडुस यांना दिले.
यावेळी शिक्षक नेते संजय धामणे, सेवा सोसायटीचे अध्यक्ष संजय काळे, ग्रामपंचायत सदस्य गजानन पुंड, नामदेव काळे, शीलाताई राजेंद्र कडुस, स्वाती नीलेश धामणे, आयेशा मुस्ताक शेख, सोसायटीचे संचालक महेश धामणे, अनिरुद्ध धामणे, ग्रामविकास अधिकारी एस. के. कसबे आदी उपस्थित होते.