जामखेड :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाशी संबंधित आरोपींच्या तालमीस जामखेड नगरपालिकेने मंगळवारी सायंकाळी सील ठोकले. जांबवाडी रस्त्यावरील ही वादग्रस्त तालीम बंद करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी नगरपालिकेकडे केली होती.
२८ एप्रिलला बीड रस्त्यावरील एका हॉटेलसमोर मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याकांडाचा थेट संबंध भुतवडा रस्त्यावरील अमरधामशेजारी असलेल्या या तालमीशी जोडण्यात आला. या तालमीत वास्तव्यास असलेला आरोपी गोविंद गायकवाड याने अल्पवयीन मुलासह इतर साथीदारांच्या मदतीने दुहेरी हत्याकांड केले होते. याच तालमीतून गुंड तयार करण्याचे काम होत असल्याचा आरोप झाल्यानंतर तालमीतून तलवारीदेखील जप्त करण्यात आल्या होत्या. ही तालीम नगरपालिकेने पाडावी अथवा ताब्यात घ्यावी, यासाठी मृतांच्या नातेवाईक व महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तसेच ३० एप्रिलच्या ग्रामसभेत व शांतता समितीच्या बैठकीत ही तालीम पाडण्याचा ठराव करण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत नगरपालिकेने १४ मे च्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी तालमीस सील ठोकण्यात आले.