जामखेड : काही वर्षांपूर्वी उत्पन्नाच्या बाबतीत नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर असलेल्या जामखेड आगाराला आता उत्पन्न कमी झाल्यामुळे पैशाअभावी डिझेल मिळत नाही. त्यामुळे आठवड्यातील तीन दिवस बसला आराम मिळत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
जामखेड शहर चार जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने येथील बसस्थानकात ये-जा करणाऱ्या बसची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथील बसस्थानक २४ तास प्रवाशांच्या सेवेसाठी खुले असते. जामखेडला आलो तर निश्चितच बस मिळेल, असा समज आहे. बसच्या प्रतीक्षेत अनेक प्रवासी जागे राहून किंवा झोप घेऊन बस स्थानकात रात्रभर थांबतात. त्यामुळे स्थानक परिसरातील व बाहेर हॉटेल व इतर दुकाने दिवस रात्र चालू असतात.
जामखेड आगारात एकूण ५१ बसेस आहेत. त्यापैकी चार शिवशाही आरामबस आहेत. या आगारातून पुणेसाठी १८, मुंबईसाठी ५, बारामतीसाठी २, करमाळासाठी ३,नाशिकसाठी २,कोल्हापूरसाठी २,सातारासाठी १, नगरसाठी ३ बसच्या फेऱ्या चालू आहेत. कोरोना सुरू झाल्यापासून तालुकांतर्गत बससेवा पूर्ण बंद आहे. तर १४ बस कोकणातील गणपती उत्सवामुळे तेथे पाठवण्यात आल्या आहेत.
जामखेड आगाराला बससाठी लागणारे डिझेल स्वत:च्या उत्पन्नातून आणावे लागते. डिझेलचे वाढते दर व कोरोनामुळे प्रवाशांची कमी संख्या, तसेच खराब रस्त्यांमुळे बसचा वाढता खर्च पाहता बस आगाराला एक टँकर डिझेल आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. उत्पन्न कमी झाल्यामुळे संपूर्ण जामखेड आगार आठवड्यातून तीन दिवस बंद ठेवावा लागतो. गेल्या दोन दिवसांपासून तर आगारातून फक्त टपाल घेऊन जाणारी एकमेव बस सुटत आहे. जामखेड आगाराच्या आशेवर असलेल्या प्रवाशांना तासनतास इतर ठिकाणावरून येणाऱ्या बसची वाट पहावी लागते.
............
१९६३ पासून जामखेड आगार सलग पाच वर्षे नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर होता. त्यानंतर ठिकठिकाणी आगार झाल्यामुळे व लांब पल्ल्याच्या बस सोडण्यावरून आगारांमध्ये स्पर्धा लागलेली आहे तसेच खासगी बस, वाहने व बेकायदेशीर वाहनांमुळे जामखेड आगाराच्या उत्पन्नात घट होत गेली.
-महादेव शिरसाठ, आगारप्रमुख, जामखेड.
.......
१४ जामखेड एसटी
140921\img_20210914_161159.jpg
( फोटो - डिझेल नसल्याने जामखेड आगारात बस जाग्यावर उभ्या आहेत)