जामखेड - शनिवारी रात्री जामखेड शहर व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतक-यांचे फळबागा, पिके व शेडनेटचे नुकसान झाले असून चुभळी परिसरात पाच घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून चालू आहे.
जामखेड शहर, जमदरवाडी, चुभळी या परिसरात शनिवारी रात्री आठच्या सुमारास ढगांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जामखेड येथील २५ शेतक-यांचे साडेआठ हेक्टर क्षेत्रातील लिबू झाडे उन्मळून पडले आहेत. दोन शेतक-यांचे शेडनेटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन त्यातील तयार झालेले शिमला मिरची पिके ४० गुंठे क्षेत्रातील बाधीत झाले आहे. तीन शेतक-यांच्या संत्राबागातील दोन हेक्टर संत्र्याचे झाडे उन्मळून पडले आहेत. तर तीन शेतक-याचे दिड हेक्टर क्षेत्रातील पेरू झाडे बाधीत झाले आहे.
जामखेड नगरपरिषद हद्दीतील चुभळी या गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पाच घरांची पडझड झाली आहे तर पाच शेतक-यांचे दोन हेक्टर क्षेत्रातील संत्र्याचे झाडे उन्मळून पडली आहेत तर एका शेतक-याची दोन एकरातील लिंबू बाग पूर्ण उध्दवस्त झाले आहे. तर जमदरवाडी येथील एका शेतक-याची एक एकर क्षेत्रावर असलेल्या लिंबू बागेतल ५० टक्के झाडे उन्मळून पडले आहेत.
शेतक-यांनी मागील वर्षी असलेल्या दुष्काळी परिस्थितीत टॅंकरने पाणी देऊन फळबागा जगवल्या होत्या व त्या आता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आज जमिनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शासनाने लवकरात लवकर शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
---
फोटो - जमदरवाडी येथील लिंबोणीचे झाडे उन्मळून पडले आहेत