जामखेड : कोरोना प्रतिबंधासाठी तहसील कार्यालयात प्रशासन, व्यापारी व काही संघटनेच्या वतीने ८ आॅगस्टपासून पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्ष, संघटनांनी विरोध केला आहे. रविवारपासून दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय सर्वपक्षाच्या वतीने घेतला आहे. याबाबत तसा फलक शहरात लावण्यात आला आहे.
कोरोना संदर्भात जनजागृती करा आणि कोरोनाबरोबर जगण्यासाठी लॉकडाऊन पर्याय नाही. संभाजी ब्रिगेड या गोष्टीचा निषेध करीत आहे. उद्यापासून होणारा लॉकडाऊन कोणी पाळू नये, असे आवाहन संभाजी ब्रिगेडञे उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांंनी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरूण जाधव, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, भाजपा शहराध्यक्ष बिभिषन धनवडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास मासाळ, नाभिक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत राऊत, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष अण्णासाहेब सावंत, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, व्यापारी संघाचे सदस्य राहुल उगले यांनी या जनता कर्फ्युला विरोध केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी आम्ही जनता कर्फ्यूच्या बाजुने असल्यानचे सांगितले.
जनता कर्फ्यूचा निर्णय व्यापारी व काही संघटना यांनी घेतला आहे. तो प्रशासनाचा निर्णय नाही. जे दुकाने उघडी राहतील त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन केले की नाही, याबाबत मुख्याधिकारी व आम्ही तपासणी करणार आहोत. जे दुकानदार नियम पाळणार नाही. त्यांच्यावर दंडात्मक व शासकीय मार्गदर्शनानुसार कारवाई केली जाणार आहे.