लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड : खासदार डॉ. सुजय विखे यांनी नुकताच जामखेड येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आमदार रोहित पवार यांच्यावर चौफेर टीका केली तर माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक केले. कार्यकर्त्यांनीही गट-तट विसरून एकजुटीने काम केल्यास जिल्ह्यात भाजपला कोणीही रोखू शकत नाही, असे सांगितले. त्यांच्या या आक्रमकपणामुळे जामखेड तालुक्यात भाजपला संजीवनी मिळाली आहे.
माजी मंत्री राम शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तालुक्यात भाजपला नैराश्य आले होते. अनेक विकासकामे करूनही पराभव झाल्याने शिंदेही नाराज झाले होते. त्यांनीही वर्षभर काहीसे तालुक्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यातच एकापाठोपाठ नगर परिषद, पंचायत समितीतील सत्ताही गेली. बाजार समितीवर प्रशासक आले. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये झालेले सत्तांतर यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते सैरभैर झाले होते. त्यातच खासदार डॉ. विखे व आमदार रोहित पवार यांची जवळीक वाढल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणखीनच अस्वस्थ झाले होते.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपकडून कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यात विखे समर्थकांना सोडण्यात आल्या. विखे कुटुंब व भाजपने या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या करून ताकदीने एकत्र लढवल्या व विजय मिळवला. त्यानंतर विजयी उमेदवारांनी आम्ही जरी विखे समर्थक असलो तरी प्रा. राम शिंदे यांचा विधानसभेत झालेला पराभव ही चूकच होती, असे म्हणत आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली.
जिल्हा बँकेच्या निमित्ताने कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांत विधानसभा निवडणुकीनंतर विखे हाच पक्ष मानणारे समर्थक भाजपला स्वीकारायला तयार झाले.
विखे यांनी आगामी नगर परिषद निवडणूक व त्यानंतर होणारी जिल्हा परिषद निवडणूक या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांची भेट घेऊन तालुक्यात विविध कार्यक्रम घेतले. या कार्यक्रमाला शिंदे यांना येता आले नाही. मात्र, विखे यांनी स्नेहमेळाव्यात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. त्यांनी रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. दुसऱ्याने आणलेल्या निधीतील कामांचे ते श्रेय घेत असल्याची खंतही व्यक्त केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार टीका केली. विधानसभा अधिवेशनात एकट्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला कसे जेरीस आणले, याचेही किस्से त्यांनी सांगितले.
---
संघर्ष करा... ताकद देतो...
यापुढील काळात विखे गट हा भाजप म्हणून काम करेल. आपण सर्वजण भाजपचेच कार्यकर्ते आहोत. एकत्रितपणे काम करू, असेही विखे यांनी सांगितले. भाजप एकत्र राहिल्यास तालुक्यात कोणतीही निवडणूक अवघड नाही. तुम्ही संघर्ष करा, तुम्हाला ताकद देतो, अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली. यामुळे तालुक्यातील भाजपला संजीवनी मिळाली आहे.