अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या दोषारोपपत्रात नाव नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. आज सकाळी जगताप यांच्या वतीने अॅड. महेश तवले यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच तपासात सहकार्य करणे व तपासात दबाव न आणणे या दोन अटी घालण्यात आल्या आहेत. दिवाणी न्यायाधीश एस.एस. पाटील यांनी जामीन मंजूर केला.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने गोळ्या घालून हत्या केली़ या घटनेनंतर गुंजाळ स्वत:हून पोलिसांत हजर झाला़ मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० व सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. विशेष पथकाने फिर्यादीत नाव असलेले आठ, तर इतर दोन अशा दहा जणांना अटक केली. हत्याकांडातील मयतांच्या कुटुंबीयांनी मात्र तपासी यंत्रणेवर आक्षेप घेतल्याने हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आला. सीआयडीचे (पुणे) पोलीस उपाधीक्षक अरुणकुमार सपकाळे यांनी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्या प्राथमिक दोषारोपपत्रात आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचा समावेश नव्हता. अन्य आठ आरोपींविरोधात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले आहे.
आमदार संग्राम जगताप यांना अखेर जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:54 PM