लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव माळवी : शेतजीवनातील अविभाज्य असलेली सावड व इर्जिक ही परंपरा आता कालबाह्य होत चालली आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणात सावड, इर्जिक दंतकथा होत असतानाच पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील काही शेतकरी आजही सावड, इर्जिकची परंपरा पुढे नेत आहेत.
‘एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे ब्रीद घेऊन सहकार क्षेत्राने जग काबीज केले. या सहकाराचा उगमस्थान अहमदनगर जिल्हा मानला जातो तर सावड व इर्जिक या परंपरेतूनच सहकार ही संकल्पना पुढे आल्याचे तज्ज्ञ सांगतात.
जुन्या काळात शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामासाठी व सुगीच्या हंगामामध्ये एकत्र येऊन एकमेकांच्या शेतात विनामूल्य काम करीत असत, याला सावड व इर्जिक म्हणत. ही परंपरा अनेक शतके सुरू होती. शेतकरी आपली बैलजोडी व सहकारी शेतकऱ्यांची बैलजोडी एकत्र करून शेतीच्या मशागतीची पेरणी, नांगरणी अशी कामे करत होता. सहकारी शेतकऱ्याला सावड्या असे संबोधतात. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात बरीचशी शेतीची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहेत. परंतु या आधुनिक यंत्रसामग्रीमुळे सावड व इर्जिक अशा जुन्या परंपरा लोप पावत आहेत. परंतु हीच परंपरा अजूनही पिंपळगाव माळवी येथील काही शेतकऱ्यांनी जपली आहे. मागील काही वर्षांपासून एकमेकांना शेतीच्या कामात मदत करतात. त्यामुळे शेतीची कामे वेळेवर होऊन पैशांची व वेळेची बचत होते.
..........
कौटुंबिक जिव्हाळा वाढतो
दोन शेतकरी स्वत:च्या शेतातील कामे केल्यानंतर इतर शेतकऱ्यांच्या शेतीतील विविध मशागतीची कामे करून देतात. एकमेकांच्या मदतीमुळे त्यांचे कौटुंबिक नाते अधिक सदृढ झाले आहे. शेतीच्या कामातील मदत व आर्थिक उत्पन्न यामुळे कुटुंबही समाधानात असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
...................
मी शाळा सोडल्यापासून शेतीची कामे करत आहे. शेतीच्या कामामध्ये वेळेला फार महत्त्व असून वेळेवर मशागत, पेरणी होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी सहकाऱ्याची मदत घेतो. सावड व इर्जिक हेच खरे शेतकऱ्याचे जीवन आहे. त्यातून एकमेकांबद्दल आपुलकी वाढते.
-सुरेश भोसले, शेतकरी
.............
आम्ही मागील दोन वर्षांपासून एकमेकांना मदत करत आहोत. त्यामुळे आमची वेळेची व खर्चाची बचत होत आहे. तसेच आमचे कौटुंबिक संबंध अधिक जिव्हाळ्याचे झाले आहेत.
-गोरख भोसले, शेतकरी
.........
१५सावड
पिंपळगाव माळवी येथे गोरख भोसले व सुरेश भोसले हे दोघे सावडकरी गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना शेतीकामात मदत करीत आहेत.