शिर्डी : येथील पत्रकार प्रा. जयंत दामोधर गायकवाड यांना पुणे येथील विद्यापीठाने पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विषयात पीएच.डी. पदवी जाहीर केली आहे. या संशोधनासाठी त्यांना एम.जी.एम. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असलेला व सरकारला शेती व शेतकऱ्यांसाठी धोरण निश्चित करताना दिशा देणारा कृषी पत्रकारिता हा विषय घेऊन संशोधन करणारे डॉ. जयंत गायकवाड हे अहमदनगर जिल्ह्यातील पहिलेच संशोधक पत्रकार ठरले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होत त्यांचे दोन शोधनिबंध देखील नामांकित जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. प्रा. गायकवाड यांनी विविध मुद्रित आणि इलेक्ट्राॉनिक माध्यमांत काम केले आहे. पत्रकारितेचे धडे देणाऱ्या विविध संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले.
या प्रबंधासाठी मार्गदर्शन करणारे प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की, गायकवाड यांच्या संशोधनाचा उपयोग राज्य व केंद्र सरकारला शेती, शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासाची धोरणे आखण्यासाठी निश्चित उपयोगी पडणार आहे. दुष्काळ, नापिकी, शेतकरी आत्महत्या, बदलते हवामान, कृषी विद्यापीठे, बाजारभाव, कर्जपुरवठा, शासकीय योजना, कर्जमाफी, प्रचार आणि प्रसारमाध्यमे आदींबाबतीत ठोस धोरणे ठरविणे यामुळे शक्य होणार आहे. डॉ. गायकवाड यांच्या संशोधनातून शाश्वत विकासासाठी परिश्रमपूर्वक उभे राहिलेले नवे आदर्श प्रतिमान हे या पीएच.डी. संशोधनाचा विषय आहे. या संशोधनातून पुढे आलेले निष्कर्ष, शिफारशी आणि फलितांचे कौतुक अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक तथा संशोधक डॉ. मार्क यांनी केला आहे. प्रा. जयंत हे राहाता येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. एस. गायकवाड आणि शिक्षिका डी. डी. गायकवाड यांचे ते सुपुत्र आहेत.
या यशाबद्दल डॉ. गायकवाड यांचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षणमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, शिर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष हरीश दिमोटे, मनोज गाडेकर, नितीन ओझा, सचिन बनसोडे, जावेद सय्यद, बाळासाहेब सोनवणे, मुन्ना भाऊ सदाफळ, संतोष राजगुरू, अभिजित भालेराव, चंद्रकांत देठे, नीता गायकवाड, रामनाथ सदाफळ, समीर बेग, आदींनी कौतुक केले आहे.
--
फोटो- ०२ जयंत गायकवाड