अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: दिल्ली समोर कोणत्याही परिस्थितीत झुकायचे नाही हा बाणा घेऊन महाविकास आघाडी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. आपल्यातून काही सरदार तिकडे गेले. तिकडे गेलेल्या सरदारांना दिल्लीमध्ये सहाव्या रांगेमध्ये स्थान मिळालं, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी गटावर नाव न घेता येथे नगर येथे सोमवारी केली.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रा व प्रचाराचा शुभारंभ पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी महायुतीच्या सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केलं. हे महायुतीचे नेते विचारतात. पण त्यापेक्षा त्यांनी दहा वर्षांमध्ये काय केलं हे सांगितलं. कोरोनाची महामारी आली. या महामारीत त्यांनी जनतेला टाळ्या वाजवायला सांगितलं. या महामारीत ५० लाख लोकांच्या जीव गेला. त्यावर सरकार बोलत नाही."
"सरकारने दोन कोटी रोजगार उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. त्याचे काय झाले. हे ते सांगत नाहीत. तरुणांच्या हाताला काम नाही. तरुण घरात बसून आहेत. टीव्ही वरती छान छान चित्र रंगवलं जातं. क्षणाक्षणाला जाहिराती येत आहेत. कोट्यावधी रुपयांच्या जाहिराती देणाऱ्याची मिळकत किती असेल, याचा अंदाज बांधता येणार नाही. इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा नवा फॉर्मुला या सरकारने आणला आहे", अशी टीका जयंत पाटील यांनी केली.