नेवासा : वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला वाळूतस्करांनी अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पथकाने ताब्यात घेतलेला जेसीबी पळवून नेला. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील निंभारी, पाचेगाव शिवारात ही घटना घडली.अवैध वाळू चोरी होत असल्याची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांना मिळाली. त्यानंतर तामसवाडीचे तलाठी संभाजी थोरात, ए.डी. गव्हाणे, मंडल अधिकारी ए.जी.शिंदे यांच्यासमवेत शासकिय वाहनातून हे पथक निंभारीकडे निघाले. निंभारीतून पाचेगाव रस्त्याकडे जात असताना जाधव वस्तीजवळ ढंपर( एमएच - ३४, एम-५१५९) पकडण्यात आला. चालक सागर हरिभाऊ पवार हा पळून गेला. पळून जात असताना त्याने पथकाला धक्काबुक्की केली. त्यानंतर वाळू उपशाच्या ठिकाणी पथक गेले असता जेसीबी पळून जात असल्याचे निदर्शनास आले. जेसीबीचा दुचाकीवरुन पाठलाग सुरु करण्यात आला. जेसीबी स्थानबध्द करण्यात आला. त्यानंतर फरार झालेला सागर पवार, हरीभाऊ अंबादास पवार यांच्यासह इतर ६ व्यक्ती तीन दुचाकीवरुन आले. यावेळी पथकाला धमकावत तहसीलदार उमेश पाटील यांच्या अंगावर जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधन राखून दुचाकी तिथेच सोडून रस्त्याच्या बाजूला उडी मारली. यावेळी जेसीबी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पोलीस बोलावूनही जेसीबी पळवून नेण्यात वाळूतस्कारांना यश आले. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात सागर हरिभाऊ पवार, हरिभाऊ अंबादास पवार यांच्यासह इतर सहा जणांविरोधात तलाठी संभाजी थोरात यांनी फिर्याद दाखल केली आहे.
महसूल पथकाला जीवे मारण्याचा प्रयत्न : वाळूतस्करांनी पळविला जेसीबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 11:54 AM