श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथील जयमल्हार गडावरील खंडोबा मंदिराला ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून झळाळी दिली आहे. गेल्या अनेक दिवसापासून मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरू आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. कोथूळ येथे उंच डोंगरावर असलेल्या जयमल्हार गडावरील खंडोबा मंदिर पुरातन काळातील आहे. १६६६ मध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराची स्थापना केली. या मंदिराचा परिसर निसर्गरम्य असा आहे. मंदिराच्या परिसरात दीपमाळ, पंचलिंब महादेव, भैरवनाथ, हनुमान मंदिर आहे. पूर्वी या डोंगरावर जाण्यासाठी पाऊलवाट होती. या पाऊलवाटेने भाविक खंडोबाच्या दर्शनासाठी जात असत. ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर यांच्या पुढाकारातून गुंडेगाव (ता. नगर) येथून गडावर जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. कोथूळ ग्रामस्थांच्या वतीने रस्त्याच्या कामासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. खंडोबा मंदिराच्या परिसरात डोंगरावर दोन बारव असून या दोन्ही बारव पाण्याने भरलेल्या असतात. गेल्या चार-पाच वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने या ठिकाणी ग्रामस्थांच्या पुढाकारातून बोअरवेल घेतला आहे. बोअरवेलला चांगले पाणी आहे. येथील मुख्य यात्रौत्सव चंपाषष्ठीला असतो. यात्रेसाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. तर दुसऱ्या षष्ठीला बीड जिल्ह्यातील हिवरा, पिंपरखेड, बाळेवाडी, आठवड येथील ग्रामस्थांची यात्रा भरते. कोथूळ ग्रामस्थांनी मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम हाती घेतले असून मंदिर कळस, सभामंडप, सिंहासन, कम्पाऊंडचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे ४० लाख रुपये यासाठी खर्च झाले आहेत. आणखी मोठे काम बाकी असून यासाठी निधीची आवश्यकता आहे. जीर्णोद्धारासाठी पंचकमिटीची स्थापना केली असून यात इंजिनिअर बापूराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेब लाटे, संतोष लाटे, मच्छिंद्र लाटे, राजेंद्र लाटे, सुदाम भोसले यांचा समावेश आहे. गडावर विजेची सोय केली आहे. गडावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. भविकांसाठी राहण्याची सोय करण्यात येणार आहे. जीर्णोध्दारासाठी पंचकमिटी, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. दानशूरांनी जीर्णोध्दारासाठी मदत करावी, असे आवाहन पंचकमिटी व ग्रामस्थांच्या वतीने केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
जयमल्हार गडाचा जीर्णोध्दार
By admin | Published: September 12, 2014 11:01 PM