शहरातील बालिकाश्रम रोडवरील चिंतामणी हॉस्पिटलजवळ सोमवारी सकाळी साडेआकरा वाजता दोघा चोरट्यांनी शुभांगी कृष्णा गोसावी यांच्या गळ्यातील २७ ग्रॅमचे दागिने ओरबाडून नेले. हे चोरटे मोटारसायकलवरून आले होते. याप्रकरणी गोसावी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी अवघ्या दीड ते दोन तासाच्या अंतराने चोरट्यांनी पारिजात चौकातील कोहिनूर मंगल कार्यालय, गुलमोहर रोडवरील स्टेट बँक चौक व प्रोफेसर चौकात तीन महिलांचे दागिने ओरबाडून पोबारा केला. एकाच दिवशी झालेल्या या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत घरफोड्यांसह रस्तालुटीच्या घटना वाढल्या असून, आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश येत आहे.
पोलिसांसमोर आव्हान
गेल्या महिनाभरात चोरट्यांनी शहरात वारंवार धूमस्टाईलने महिलांचे दागिने ओरबाडून नेले आहेत. विशेष म्हणजे अनेकवेळा एकाच दिवशी तीन ते चार घटना घडल्या आहेत. या सराईत चोरट्यांना पायबंद घालण्यात शहरातील तिन्ही ठाण्यातील पोलिसांना अपयश येत आहे.