श्रीगोंदा : क्रॉसिंगसाठी थांबलेल्या पुणे-जम्मूतावी झेलम एक्सप्रेसवर दगडफेक करीत रेल्वेतील महिलांना लुटण्याची घटना सोमवारी सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ते लिंपणगाव रेल्वे मार्गादरम्यान ही लूट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पुण्याहून सुटलेली पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस सायंकाळी सातच्या दरम्यान दौंड स्टेशनमध्ये आली. ही रेल्वे साडेसातच्या सुमारास दौंडमधून निघाली. स्टेशन सोडल्यानंतर १५ मिनिटांच्या अंतरावर काष्टी ते लिंपणगाव दरम्यान ही रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबली होती. त्याचवेळी अंधारात लपून बसलेल्या चोरट्यांनी गाडीच्या बोगीवर दगडफेक करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून हात घालून महिलांच्या गळ्यातील चैन तसेच दोन मोबाईल संच, हातामधील घड्याळ असा एकूण ९५ हजार रूपयांचा मुद्देमाल लुटला.गाडी नगर रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर आर. बी दास, वैष्णवी हेमराज हेगडे, राणी खान यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस़ डी़ दिवटे हे करत आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ते लिंपणगाव रेल्वे मार्गादरम्यान झेलम एक्सप्रेस लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 5:44 PM