- सचिन धर्मापुरीकर कोपरगाव (जि. अहमदनगर) : श्रध्देचा, भावनेच्या विषयाला कमीत कमी निवडणूकीच्या काळात हात घालायचा नसतो. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाच्या बाबतीत केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे असे मी मानतो. ते संघटनेचे आहे, असे वाटत नाही. मधमाशांच्या पोळ्याला दगड का मारायचा. निवडणुकीच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नका, असा सल्ला आ. एकनाथ खडसे यांनी दिला.
शिर्डी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 'ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची' या मंथन शिबिरात खडसे बोलत होते. पुढे ते म्हणाले, राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. महिला, मुलींवर आत्याचार वाढले आहेत. शेतमालाला भाव नाही, सत्ताधारी पक्षाच्या गुंडांना अभय दिले जाते. पोलिस यंत्रणा नाकाम झाली आहे. हेच मुद्दे घेऊन जनतेसमोर जा, असे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.
भाजपकडे डेव्हलपमेंटवर बोलण्यासारखे काही नाही. त्यामुळे आता श्रीरामाच्या नावाने राजकारण सुरू आहे. आश्रता आल्या, मंगल कलश आले. यांचे धंदे मी चांगले ओळखतो. चाळीस वर्षे त्यांच्यात होतो. एकच ध्येय पदाधिकाऱ्यांनी समोर ठेवावी. निवडणुका जिंकून सत्ताधाऱ्यांना खाली खेचा असे आवाहनही खडसे यांनी केले.