आषाढी एकादशी एक महिन्यावर येऊन ठेपली की नाशिक, नगर जिल्ह्यांतील हजारो वारकऱ्यांचे पाय पंढरपूरच्या दिशेने निघतात. जवळपास एक महिना मजल दर मजल करत वारकरी भक्तिरसात तल्लीन होऊन विठुरायाला भेटायला जातात. मागील वर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने वारी बंद करून प्रातिनिधिक स्वरूपात वारी काढून आषाढी साजरी केली होती. यंदा देखील कोरोनाचे संकट अजूनही गडद आहे, रुग्णसंख्या मंदावली असली तरी कोरोना आजार गेला असं म्हणता येणार नाही. शासन स्तरावर कोरोनाचा विळखा थोडा सैल झाल्यामुळे मानाच्या दहा पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे. देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यांसाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.
परंपरा खंडित करून भाविकांचा अंत न पाहता पंढरपूरला वारीत जाणाऱ्या प्रत्येक भाविकाची कोरोना चाचणी करून त्यांना लस देऊन यंदा वारीचा सोहळा व्हायला हवा होता. वर्षानुवर्षे सवय झालेल्या मार्गाला वारकऱ्यांचा पदस्पर्श यंदाही होणार नाही. वारकऱ्यांसह हा मार्गही विठुमाउलीच्या भेटीसाठी आसुसला आहे.
.....................
सोहळा व्हायला हवा होता...
⏺️गतवर्षी कोरोनाचे संकट नवे होते. परंतु सध्या परिस्थिती सुधारलेली आहे, यामुळे शारीरिक अंतर ठेवून आषाढी यात्रेचा सोहळा कमी लोकांमध्ये तरी झाला पाहिजे होता. परंपरेचा हा सोहळा आहे. मानाच्या पालख्यांसह किमान ५०० वारकऱ्यांना पायी चालत येण्याची परवानगी देण्यात यायला हवी होती. वारकरी संप्रदाय नक्कीच सरकारवर नाराज आहे.
- हभप मोहन महाराज बेलापूरकर, प्रमुख मानकरी, श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी सोहळा.
..........................
दर्शनासाठी पालखी मार्गही आसुसला....
⏺️नाशिक जिल्हा सोडल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना पारेगाव (ता. संगमनेर) येथे या पालखीचा पहिला मुक्काम. त्यानंतर गोगलगाव, राजुरी (ता. राहाता) बेलापूर (ता. श्रीरामपूर) राहुरी, डोंगरगण (ता. नगर) दोन दिवस अहमदनगर शहर, साकत (ता. श्रीगोंदा) घोगरगाव, मिरजगाव (ता. जामखेड) कर्जत, कोरेगाव असे आठ दिवस या पालखी सोहळ्याचा अहमदनगर जिल्ह्यातील मुक्काम व मार्ग. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता हा पालखी सोहळा थेट पंढरपूरला जाणार असल्याने हा पालखी मार्गही विठुमाउलीच्या दर्शनासाठी आसुसला आहे.
...................
आनंद सोहळ्याला मुकलो....
⏺️अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करताना पारेगाव (ता. संगमनेर) येथे या पालखीचा पहिला मुक्काम. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याची आणि जिल्ह्याच्या वतीने या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याची एक मोठी पर्वणीच असते. पण यावर्षीही पालखी सोहळा नसल्यामुळे त्याची खंत नक्कीच आहे. या आनंद सोहळ्याला यंदाही मुकलो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीत खंड पडू नये म्हणून सुरक्षा वारी, असा संदेश देत-घेत वारी व्हायला हवी होती.
- डॉ. संध्या त्र्यंबक गडाख, सरपंच, पारेगाव (ता. संगमनेर)
.................
⏺️वारी हा महाराष्ट्रातील भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. सध्याची कोरोनाची स्थिती व वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता. कोरोनाची साथ आहे हे खरे असले तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन, बंदोबस्तामध्ये जनभावनेचा विचार करून मोजक्याच भाविकांसह परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्यास चालत जाण्याची परवानगी देणे गरजेचे होते.
- शामराव वाणी, वारकरी, पढेगाव(ता. श्रीरामपूर)
250621\img_20190624_171239716.jpg
दोन वर्षापूर्वी (२०१९) आषाढी वारीसाठी पंढरपूर कडे मजल दरमजल करत निघालेल्याश्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे संग्रहीत छायाचित्र.