करंजी : तालुक्यातील जोहारवाडी शिवारात गुरुवारी (दि.१४ मे) वादळीवा-यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून संसार उघड्यावर पडला. अनेक झाडे कोसळली. संत्र्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या वादळात कोणतीही जिवितहानी झाली नाही. गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान करंजी परिसरातील भोसे, खांडगाव, जोहारवाडी परिसरात जोरदार वादळाने अक्षरश: थैमान घातले. यात जोहारवाडी गावातील मच्छिंद्र म्हस्के, संजय निमसे, बंडू रघुनाथ सावंत, भाऊराव वांढेकर, भिमराज निमसे, भाऊसाहेब चौधरी, अंकुश वांढेकर, मोहन रघुनाथ वांढेकर, साखरबाई सीताराम शिंदेसह अनेक लोकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचे संसार अक्ष२श: उघड्यावर पडले. विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. शेतक-यांच्या कडब्याच्या गंजी उडून गेल्या. सुदैवाने या वादळात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. विदर्भाच्या दौ-यावर असलेल्या मंत्री प्राजक्त तनपुरे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने दखल घेतली. या गावातील नुकसानीची पाहणी करून तनपुरे यांचे स्वीय सहाय्यक संजय गोरे, मंडल अधिकारी विजय दगडखैर, तलाठी भराटे मॅडम, खुडे भाऊसाहेब आदिंनी पंचनामे केले. तनपुरे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जोहारवाडीतील सरपंच कविता सावंत, जोहारवाडी सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र सावंत व ग्रामस्थांनी पाहणी करुन नुकसानग्रस्त कुटुंबांना धीर दिला. याप्रसंगी सीताराम सावंत, लालासाहेब सावंत, दादा वांढेकर, अजय पाठक, अशोक टेमकर, जालिंदर वामन यांच्यासह अनेक कार्यकर्ते हजर होते.
पाथर्डी तालुक्यातील जोहारवाडी येथे गुरुवारी झालेल्या वादळात नुकसानीचे शासन निर्णयानुसार पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्त कुटुंबाला त्यानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे पाथर्डीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले.