निघोज : ग्रामीण भागात जिद्दी व कष्टाळू विद्यार्थी असतात. आत्मनिर्भर श्रद्धाची वाटचाल ही प्रेरणादायी असून ती देशपातळीवरील मुलींसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी केले.
निघोज (ता. पारनेर) येथील मुलिकादेवी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील श्रद्धा सत्यवान ढवण या विद्यार्थिनीने स्वतःचे शिक्षण सुरू ठेवत साठ म्हशींचा सांभाळ करून तिने कुटुंबाला हातभार लावला आहे. केंद्र शासन, राज्य शासन, पुणे विद्यापीठ, आत्मनिर्भर भारत या योजनेच्या अधिकाऱ्यांनीही श्रद्धाच्या कामगिरीची दखल घेतली. याबद्दल महाविद्यालयातही नुकताच श्रद्धाचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते.
यावेळी प्रा. राम खोडदे, अशोक कवडे, प्रवीण जाधव, नीलिमा घुले, संगीता मांडगे यांनीही तिचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी श्रद्धाची आई जानकी ढवण, वडील सत्यवान ढवण, भाऊ कार्तिक ढवण, चुलती उज्ज्वला ढवण व वैशाली ढवण उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मनोहर एरंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आनंद पाटेकर यांनी केले, तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. गोविंद देशमुख यांनी आभार मानले.
फोटो : १० निघोज
निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयात श्रद्धा ढवण हिचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.