अहमदनगर : अहमदनगर लोकसभेच्या मैदानात भाजप, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता आम आदमी पार्टीनेही उडी घेतली आहे़ लवकरच आपचा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होईल, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष तनवीर बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़शुक्रवारी आपच्या पदाधिकाऱ्यांची नगरमध्ये बैठक झाली़ या बैठकीत नगरची जागा लढविण्यासंदर्भात बैठक झाली़ दिल्लीचे मुख्यमंत्री व पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत केलेली विकास कामे जनतेसमोर ठेवून नगरमध्येही आप मतांचा जोगवा मागणार आहे़ लोकसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला़ तसेच इच्छुक नावांवर चर्चा करुन लवकरच उमेदवाराची घोषणा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला़ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आपने महाराष्ट्रात उमेदवार उभे केले होते. अहमदनगर लोकसभेसाठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी निवडणूक लढविली होती़ सय्यद यांना अवघी ७ हजार मते मिळाली होती़ मात्र, या वर्षी दीपाली सय्यद निवडणूक लढवणार नाहीत़ त्यामुळे आप सय्यद यांच्याऐवजी अन्य उमेदवारांच्या शोधात आहे़तीन नावांवर चर्चाआपकडून अहमदनगरच्या जागेसाठी अॅड. जावेद काझी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती कमल सावंत, माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश शेलार यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, अद्याप कोणाचेही नाव अंतिम झालेले नाही़ त्यामुळे आपकडून कोणाला उमेदवारी मिळते आणि कोण प्रत्यक्ष निवडणूक लढण्यासाठी तयार होतं हे लवकरच स्पष्ट होईल.
Lok Sabha Election 2019: लोकसभेच्या रणांगणात आपचीही उडी : अहमदनगरची जागा लढवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:44 AM