जामखेड : गेल्या पाच वर्षांपासून महायुतीचा भाजपाचा आमदार असून सेनेला कधीच जवळ केले नाही. उलट सापत्न वागणूक देऊन जि.प. व पं.स. निवडणुकीत युती केली नाही. सेनेची ताकद असून, त्याकडे दुर्लक्ष केल्याने या विधानसभा निवडणुकीसाठी सेनेने स्वतंत्र लढावे, असा सूर सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बैठकीत लावला. सेनेची उमेदवारी शिवसेना उपनेते रमेश खाडे व शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात यापैकी एकाने करावी, अशी एकमुखी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केल्यामुळे महायुतीत फूट पडली आहे. त्यामुळे भाजपाचे विद्यमान आमदार राम शिंदे यांच्यापुढे अडचण निर्माण झाला आहे.तालुका शिवसेनेची बैठक सेना कार्यालयाच्या प्रांगणात झाली. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा की, स्वतंत्र लढायची यासाठी तालुक्यातील ८९ शाखा प्रमुख, तालुका प्रमुख वैजीनाथ पाटील, उपप्रमुख शहाजीराजे भोसले, शहर प्रमुख शामीद सय्यद, युवा सेना तालुका प्रमुख पवनराजे राळेभात, खर्डा गट प्रमुख भिमराव लेंडे, सोनेगाव गण प्रमुख आशू्र खोटे, जातेगाव दिघोळ प्रमुख गोवर्धन गायकवाड, शहर संपर्क प्रमुख दिगंबर चव्हाण, शहर विभाग प्रमुख बंडू डांगरे, पिंपरखेड गट प्रमुख नजीर शेख यासह अनेक कार्यकर्त्यांनी सेनेची मागील पाच वर्षात भाजप आमदाराकडून मिळालेल्या सापत्न वागणुकीचे प्रसंग सांगितले. काही करा परंतु स्वतंत्र लढा व सेनेच्या विचाराचा आमदार करा अशी आग्रही मागणी केली.यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात म्हणाले, सेनेची ताकद असून, भाजपा त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मतदारसंघात सेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणूक लढणे हाच एकमेव पर्याय असून, कर्जत मेळाव्यात उमेदवाराची घोषणा करू व सेनेची ताकद दाखवून देऊ. सेनेच्या तालुकास्तरीय मेळाव्यात कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याची घोषणा केल्यामुळे मतदारसंघात महायुतीत फूट पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
जामखेडमध्ये सेनेचे बंड!
By admin | Published: September 13, 2014 10:35 PM