पाथर्डी : स्व.गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोडणी कामगारांवर निर्वाज्य प्रेम केले. सध्या तोडणी कामगारांचा संप सुरु आहे. त्यांचे प्रश्न लवादामार्फत सोडविले जातात. लवादावर घेण्यासाठी सरकार ऐकून न ऐकल्यासारखे करीत आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्री पदापेक्षा लवादावर जाणे महत्वाचे असून तोडणी कामगारांना न्याय मिळवून देणार आहे, अशी ग्वाही भाजपाच्या नेत्या आ.पंकजा मुंडे यांनी देत येत्या विधानसभा निवडणुकीत मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्ता परिवर्तन करा, असे आवाहन केले. बुधवारी दुपारी शहरात आ.पंकजा पालवे-मुंडे यांची संघर्ष यात्रा पोहोचली. यावेळी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खा.दिलीप गांधी, आ.शिवाजीराव कर्डिले, प्रदेश सरचिटणीस सुरदीपसिंग ठाकूर, रणजित सांगळे, ज्येष्ठ नेते अशोकराव गर्जे, माजी आ.दगडू पा.बडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, उद्योगपती भिमराव फुंदे, सी.डी.फकीर, अशोक चोरमले , जि. प. सदस्या हर्षदा काकडे , माजी नगराध्यक्ष दिनकरराव पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पंकजा मुंडे यांनी भावपूर्ण भाषण केले. त्यांनी सुरुवातीलाच ‘मुंडेसाहेब नेहमी म्हणायचे परळी माझी आई तर पाथर्डी मावशी आहे. त्यांनी पाथर्डीवर जेवढे प्रेम केले त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम पाथर्डीकरांनी त्यांच्यावर केले. त्यांचाच वारसा घेवून मी रणांगणात उतरले आहे. त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी मी झगडत रहाणार आहे. माझ्या संघर्ष यात्रेला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळत आहे ती त्यांचीच कृपा आहे. त्यांची ताकद काय होती हे जगाला मी दाखवून देणार आहे.’ राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य माणूस सोलून निघाला आहे. वीज किती तास नसते यापेक्षा किती तास असते हे आता मोजावे लागते. त्यामुळे या सरकारला खाली खेचण्यासाठी मी संघर्षयात्रा काढली असून या संघर्षयात्रेला मिळणारा प्रतिसाद पहाता ही संघर्ष यात्रा म्हणजे येणाऱ्या परिवर्तनाची नांदी आहे. आता मी रडणार नाही तर लढणार असून मी कोणापुढे झुकणार नाही व समाजसेवा करण्याचा वसा खाली कधीच ठेवणार नाही असे भावपूर्ण शब्दात सांगताच उपस्थितांनी त्याला टाळ्या वाजवून दाद दिली. (तालुका प्रतिनिधी)
मुख्यमंत्रिपदापेक्षा ऊस तोडणी कामगारांना न्याय महत्वाचा
By admin | Published: September 17, 2014 11:43 PM