पारनेर (अहमदनगर) : आत्महत्येचा इशारा दिलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने चर्चेत आलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची रविवारी सकाळी भेट घेतली. दरम्यान, पारनेरच्या तहसील कार्यालयातील कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी यांनी ज्योती देवरे यांच्या बदलीसाठी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपणाला त्रास होत असल्याने दीपाली चव्हाण यांच्या मार्गाने जावे वाटते, असे निवेदन करणारी देवरे यांची क्लिप व्हायरल झाली आहे. त्यांचा रोख आमदार नीलेश लंके यांच्या दिशेने असल्याने शनिवारी लंके यांनी हजारे यांची भेट घेऊन याप्रकरणी आपले म्हणणे मांडले होते. देवरे यांच्या कामकाजाबाबत तक्रारी केल्या. या पार्श्वभूमीवर रविवारी देवरे यांनी हजारे यांची भेट घेतली. आपण चांगले काम करीत असून, तुमचा आशीर्वाद हवा आहे, असे त्या अण्णांना म्हणाल्या. तसेच त्यांनी हजारे यांना राखीही बांधली. अधिकाऱ्यांनी आत्महत्येचा विचार न करता खंबीरपणे काम केले पाहिजे, असा सल्ला हजारे यांनी देवरे यांना दिला असल्याचे अण्णा हजारे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. दरम्यान, पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार यांच्यासोबत काम करणे आम्हाला अशक्य झाले आहे. त्यांच्यापुढे संचिता ठेवल्या असता, त्या सह्या करीत नाहीत. यामुळे कामे प्रलंबित राहतात व आम्हाला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांची बदली व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे.
-----
२२ ज्योती देवरे
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी रविवारी सकाळी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली.