अहमदनगर : महापालिका झाली आणि शिवसेनेचा पहिला महापौर झाला. पहिल्याच सभेत समर्थनगरच्या पाण्याच्या टाकीचा ठराव मंजूर झाला. ही टाकी आता पूर्ण झाली असली तरी केवळ सहा लाख रुपये खर्चाचे काम अपूर्ण राहिल्याने ही टाकी अद्यापही कोरडीच आहे. दिवाळीपर्यंत या पाण्याच्या टाकीतून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर सुरेखा कदम यांनी दिली आहे.समर्थनगर येथील बांधकाम पूर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीची महापौर कदम यांनी मंगळवारी सकाळी पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त दिलीप गावडे, उपमहापौर श्रीपाद छिंदम, सभागृह नेते अनिल शिंदे, शहर शिवसेना प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक संजय शेंडगे, योगिराज गाडे, नगरसेविका सुनीता फुलसौंदर, अवधूत फुलसौंदर आदी उपस्थित होते.समर्थनगर येथे पाण्याची टाकीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या टाकीला इनलेट-आऊटलेट जोडण्याचे काम राहिलेले आहे. या टाकीतून पाणी पुरवठा झाल्यास सारसनगर, माणिकनगर, बुरुडगाव परिसरातील रहिवाशांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. यातील सारसनगर, बुरुडगाव परिसरात आजही पाण्याचे टँकर सुरू आहेत. टँकरसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात, मात्र सहा लाख रुपयांच्या कामासाठी या पाण्याच्या टाकीला जलवाहिन्या जोडण्याचे काम रखडलेले आहे. २००३ साली पहिले महापौर भगवान फुलसौंदर यांनी या टाकीचे काम प्राधान्याने हाती घेतले होते. मात्र दहा वर्षानंतरही हे काम अपूर्ण स्थितीत आहे. या टाकीतून पाणी सोडण्यासाठी पुन्हा शिवसेनेलाच सत्तेवर यावे लागले,हे येथील राजकारण्यांचे दुर्दैव आहे, अशाही प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांमध्ये व्यक्त झाल्या.दरम्यान या टाकीच्या कामाची पाहणी करून अपूर्ण कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले आहेत. यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
समर्थनगरचा जलकुंभ दहा वर्षानंतरही कोरडाच
By admin | Published: August 09, 2016 11:51 PM