अहमदनगर- केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आता काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला कामरगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. विशाल कोतकर हा हत्याकांडात संशयित मुख्य सूत्रधार असल्याचीही चर्चा आहे. आतापर्यंत या हत्याकांडात 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.तत्पूर्वी शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाला कारणीभूत ठरलेल्या रवी खोल्लम याला पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले होते. केडगाव येथे 7 एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व गुप्तीने वार करून हत्या झाली होती. घटनेनंतर रवी खोल्लम फरार झाला होता. केडगाव पोटनिवडणुकीत मतदानाच्या कारणावरून संजय कोतकर व खोल्लम यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर संजय कोतकर यांनी खोल्लमला धमकी दिल्याचं समोर आलं होतं.आरोपी संदीप गुंजाळ (मारेकरी), बाबासाहेब केदार, संदीप गि-हे व महावीर मोकळे यांची पोलीस कोठडी गुरुवारी न्यायालयाने 21 एप्रिलपर्यंत वाढवली. खोल्लमला 24 एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तसेच या हत्याकांडप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आमदार संग्राम जगताप, बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर यांच्या कोठडीत दोन दिवसांची तर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याच्यासह बाबासाहेब केदार यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
केडगावातल्या दोन शिवसैनिकांचं हत्या प्रकरण, काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 9:01 AM