अहमदनगर चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने राज्यातील जनतेच्या भावना दुखविल्या आहेत. याच्या निषेधार्थ नगर येथे शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे कंगना यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेस जोडे मारुन प्रतिमेचे दहन करण्यात आले.
या आंदोलनात शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, उपजिल्हा उपप्रमुख गिरिश जाधव, नगरसेवक योगिराज गाडे, अमोल येवले, विजय पठारे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, शशिकांत देशमुख, बाबू कावरे, संग्राम कोतकर, अभिषेक भोसले, अक्षय कातोरे, विशाल गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होेते.
याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले, ज्या महाराष्ट्रात राहतो, ज्या राज्यात कमवतो, त्या राज्याच्या विरोधात भूमिका म्हणजे एकप्रकारे देशद्रोहच आहे. महाराष्ट्राने नाव दिले, पैसे दिले. तरीही तेथील पोलीस, मुख्यमंत्री यांच्याबाबत बेताल वक्तव्य करुन एकप्रकारे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा कंगना राणावत यांनी अपमान केला आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. कंगनाच्या वक्तव्याचा सर्व शिवसैनिक तीव्र निषेध करीत आहेत. कंगनावर तातडीने गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यापुढे नगर जिल्ह्यात कंगना यांचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, कंगना राणावत यांनी नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. तिचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. अशा व्यक्तीला महाराष्ट्रात स्थान नाही. कंगनाच्या कार्यक्रमांवर, चित्रपटांवर जनतेने बहिष्कार घालावा. ----------अहमदनगर शहरामध्ये अभिनेत्री कंगना राणावत यांच्या प्रतिमेचे दहन करून त्यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. चितळे रोडवरील नेता सुभाष चौकात झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे आदी सहभागी झाले होते.