पाथर्डी : भाविकांनी कानिफनाथ देवस्थानच्या दान पेटीत टाकलेली देणगी मोजणी करीत असताना देवस्थानचे सचिव सुधीर भाऊराव मरकड यांनी तीस हजार रुपये चोरल्याप्रकरणी त्यांच्यावर पाथर्डी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. देशभरात कानिफनाथ देवस्थान हे भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. या देवस्थानाला भाविक मोठ्या प्रमाणावर रोख देणगी देत असतात. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला देणग्यांची मोजदाद होत असते. देणगी मोजण्यासाठी येथील कर्मचाºयांना खिसे नसलेले ड्रेस कोड ठरवून दिलेला आहेत. अपहार होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवलेले आहेत. देणगी रकमेची मोजणी करताना धर्मदाय आयुक्त कार्यालयातील एक प्रतिनिधी यावेळी उपस्थित असतो. परंतु ५ आॅगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे दक्षिणा पेटीतील मोजणी सुरू होती. यावेळी मोजदाद कक्षात विश्वस्त सचिव सुधीर भाऊराव मरकड यांनी ५०० रुपये रकमेच्या ६० नोटा अशी ३० हजार रुपये रकमेचा बंडल स्वत:च्या खिशात घातले. ही रक्कम चोरताना देवस्थानचे कर्मचारी अशोक कुंडलिक मरकड यांनी पाहिले. याबाबत देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेºयात चित्रीकरण देखील झालेले आहे. याबाबत त्यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या, परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे सदर प्रकार अध्यक्ष शिवशंकर राजळे यांना मरकड यांनी सांगितला. दरम्यान १६ आॅगस्ट रोजी मढी येथे ग्रामसभा घेण्यात आली. यात पैसे चोरणाºया विश्वस्त आरोपी सुधीर मरकड यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव केला. देवस्थानच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वतावर चोरीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:15 AM