मिरीत साकारणार नाथ जन्माची प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 9:56 PM
अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे ज्याप्रमाणे चैतन्य कानिफनाथांचा हत्तीच्या कानातून जन्म झाल्याची प्रतिकृती साकारण्यात आली त्याचधर्तीवर मिरी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ देवस्थाननेही कानिफनाथ जन्माची प्रतिकृती साकारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
मिरी : अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे ज्याप्रमाणे चैतन्य कानिफनाथांचा हत्तीच्या कानातून जन्म झाल्याची प्रतिकृती साकारण्यात आली त्याचधर्तीवर मिरी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ देवस्थाननेही कानिफनाथ जन्माची प्रतिकृती साकारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मिरी देवस्थानची प्रती ‘मढी’कडे वाटचाल सुरू आहे. घोडेगाव येथे परप्रांतीय कारागिरांनी बनवलेल्या हत्तीची प्रतिकृती मिरी येथील सुमारे ३१ फुट उंची असलेल्या बांधकामावर क्रेनच्या साहाय्याने बसविण्याचे काम सुुरू आहे. सुमारे पाच ते सहा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर हत्तीची प्रतिकृती योग्य पद्धतीने बसविण्यात आली. येत्या काही दिवसांतच येथील उर्वरित बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देवगड देवस्थानचे मठाधिपति महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते याचे अनावरण होणार असल्यांचे सांगण्यात आले. कानिफनाथांनी मढी येथे संजीवनी समाधी घेण्यापूर्वी बरेच दिवस मिरी येथे वास्तव्य केलेले असल्याने मिरी गावाला नाथभक्तांच्या मनात अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी मढी येथे भरणाºया नाथांच्या यात्रेच्या वेळी येणारा प्रत्येक नाथभक्त आपल्या सोबत आणलेल्या नाथांच्या काठीला मिरी येथील नाथमंदिरात आधी पहिला मान दिल्यानंतरच पुढे मढीकडे मार्गक्रमण करतो. मिरी येथे नाथ जन्माची प्रतिकृती साकारल्यानंतर मढी प्रमाणेच भव्य नाथमंदिर व गड बांधण्यात येणार आहे. त्यामुळे मिरी गावे प्रती ‘मढी’ म्हणून नावारूपास येण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी नाथभक्तांनी मदत करावी, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले.