अशोक मोरे । करंजी : गाडीवाला आया, घरसे कचरा निकालो!, असे कचरा संकलन करणा-या वाहनावरील गाणे कानावर पडताच करंजी (ता. पाथर्डी) येथील हॉटेल व्यावसायिक, ग्रामस्थ कचरा त्या वाहनात टाकतात. येथील बसस्थानक परिसरातील व गावातील कचरा मोफत उचलण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे व त्यांची तीनही मुले गेल्या १५ महिन्यापासून करीत आहेत. विशेष म्हणजे या कच-यापासून ते खतनिर्मितीही करत आहेत.नगर-पाथर्डी मार्गावरील करंजी हा महत्वाचा थांबा आहे. येथील प्रसिद्ध असलेले भेळ, भजे, कुंदा खाण्यासाठी लांब-लांबचे प्रवाशी आवर्जुन थांबतात. त्यामुळे सहाजिकच येथील हॉटेल व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बसस्थानकावर तीसहून अधिक हॉटेल आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांना कचरा विल्हेवाटीचा प्रश्न भेडसावत असे. येथील सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे यांनी या बसस्थानकावरील तसेच गावातील कचरा साफ करण्याचे ठरविले. कचºयापासून खतनिर्मिती होवू शकते हे ओळखून त्यांनी घरीच आपल्या शेतीवर खत निर्मितीचा छोटा प्रकल्प तयार केला. कचरा संकलन व वाहतुकीसाठी त्यांनी कचरा गाडी तयार केली. सकाळ-संध्याकाळी न चुकता कचरा संकलन करण्याचे काम त्यांची मुले सुरज क्षेत्रे, धीरज क्षेत्रे व सिद्धार्थ क्षेत्रे करीत आहेत. कचरा गाडीवर ‘लाऊड स्पिकर’ बसविलेला आहे. त्याचे गाणे ऐकून ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिक साठलेला कचरा त्या वाहनात टाकतात. त्यांच्या खत निर्मितीच्या प्रकल्पाला आतापर्यंत परिसरातील अनेक अधिकारी, राजकीय पदाधिकाºयांनी भेटी दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल हॉटेल व्यावसायिक व ग्रामस्थांचे आभार मानत आहेत.
करंजी बसस्थानक परिसरातील हॉटेल, गावातील कचरा स्वखर्चातून उचलत आहे. त्यातून खत निर्मिती केली जाते. या प्रकल्पास अनेकांनी भेटी दिल्या. मात्र शासकिय पातळीवर कोणतीच दखल घेतली नाही व मदतही मिळाली नाही, असे करंजी येथील सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे यांनी सांगितले.
करंजी बसस्थानक परिसरातील हॉटेल्समधील व गावातील कचरा उचलण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे करीत आहेत. यामुळे गाव स्वच्छ सुंदर राहते. हा त्यांचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे सरपंच बाळासाहेब अकोलकर यांनी सांगितले.