करंजी : बॉम्बे हॉटेल, उत्तरेश्वर हॉटेल आणि त्यापाठोपाठ शिवशंकर हॉटेल भरदिवसा चोरट्यांनी फोडून रोख रक्कम व खाद्य पदार्थाची नासधुस केली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आणि व्यावसायिकांनी नगर -पाथर्डी महामार्गावर सुमारे दोन तास रास्ता -रोको आंदोलन केले.मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी करंजीतील हॉटेल व्यवसायिकांनी काल(गुरुवारी) आपले व्यवसाय बंद ठेवले होते. बसस्थानक परिसरात शुकशुकाट होता. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी शिवशंकर हॉटेलच्या मागील बाजूचे शटर तोडून हॉटेलमधील चिल्लर, रोख रक्कम लुटली. हॉटेलमधील खाद्यपदार्थाचे मोठ्या प्रमाणात नासधुस करण्यात आली असून त्यावर विषारी औषधाचा फवारा मारला आहे. मागील हॉटेलच्या चोरी प्रकरणात गोचीड मारण्याची बाटली आढळून आली होती. काल सायंकाळी शिवशंकर हॉटेलचे मालक तमीज शेख यांच्या चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला.आज सकाळी शिवशंकर हॉटेलमध्ये चोरी झाल्याची खबर ग्रामस्थांना कळताच संतप्त ग्रामस्थ व हॉटेल व्यावसाईकांनी गाव बंद व रास्ता -रोको आंदोलन केले. महिन्यात झालेल्या आठ चो-यांचा तपास त्वरित करावा. पोलिस चौकीवर कायमस्वरूपी नेमणुक करावी आदि मागण्यासंदर्भात पोलिस खात्याने लेखी द्यावे, असा आंदोलकांनी आग्रह धरल्याने सुमारे दोन तास रास्ता- रोको आंदोलन चालल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली होती. पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी लेखी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी बाळासाहेब अकोलकर, जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे, रफिक शेख, सुनिल साखरे आदिंची भाषणे झाली. आंदोलनात महादेव अकोलकर, जबाजी अकोलकर, सुभाष अकोलकर, शिवाजी भाकरे तसेच हॉटेल व्यावसाईक दत्तात्रय अकोलकर, बंडु अकोलकर, महादेव गाडेकर, मुरडे मामा, अजिनाथ अकोलकर यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.
करंजी येथील चो-याबाबत आपण येत्या आठ दिवसात तपास लावून आरोपी गजाआड करू. चौकीवर आजपासूनच २ पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करित आहोत. - राकेश माणगावकर, पोलीस निरीक्षक