राशीन (जि. अहमदनगर) : कोरेगाव - भीमाची दंगल ही भाजपनेच घडवून आणली आहे. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत दलित व मुस्लिम मतदार एक होत असल्याचे भाजपच्या लक्षात आले. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत ८० जागा कमी होतील याची भीती भाजप नेत्यांना आल्याने त्यांनी प्रत्येक मतदारसंघात जातीय वाद पेरला असल्याचा आरोप युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.खेड (ता.कर्जत) येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आले असता डॉ. सप्तर्षी बोलत होते. ते पुढे म्हणाले, गुजरात निवडणुकीत निकाल कमी लागल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका नजरेसमोर ठेऊन महाराष्ट्रात मराठा, माळी, धनगर व वंजारी या समाजात जातीवादाचे द्वेष पसरविण्याची भाजप खेळी करीत आहे. आघाडी सत्तेच्या काळात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केलेला गैरव्यवहार पचविण्यासाठीच भाजपच्या बिळात त्यांनी घुसखोरी केली. ते कसले आले पक्षनिष्ठ? अशी टीका डॉ. सप्तर्षी यांनी करीत ईव्हीएम मशिनमधला घोळ हा ठराविक मतदारसंघातच केला जातो. या कारणामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत मतपत्रिकांची मागणी जोर धरील, त्यातूनही मोदी सत्तेवर आल्यास हुकूमशहा होतील, असेही ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत सप्तर्षी म्हणाले, गुजरात निवडणुकीत त्यांच्या पक्षाची ताकद नसताना उमेदवार उभे करुन महाराष्ट्रातील मित्रपक्ष कॉँग्रेसचा विश्वास त्यांनी कमी केला. राहुल गांधी यांना भाजपच्या अगोदर काँग्रेसवालेच पप्पू म्हणत असल्याची टीका डॉ. सप्तर्षी यांनी काँग्रेस नेत्यांवर केली.
कोरेगाव-भिमाची दंगल भाजपमुळेच - कुमार सप्तर्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 7:56 PM