अहमदनगर : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी कर्जत येथील श्री सदगुरू गोदड महाराज क्रीडा नगरी सज्ज झाली असून गुरुवारपासून (दि.२८) या स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याने कर्जत नगरी क्रीडामय झाली आहे.राज्य सरकारच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने या स्पर्धा प्रत्येकवर्षी आयोजित करण्यात येतात. या वर्षीच्या राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा यावर्षी कर्जत येथे होत आहेत. या स्पर्धा २८ डिसेंबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत कर्जत-नगर रोडलगत उभारण्यात आलेल्या श्री सदगुरू गोदड महाराज क्रीडा नगरीत होत आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रयत्नामुळे या स्पर्धा आयोजित करण्याचा मान कर्जतला मिळाला आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली आहे. शिवछत्रपती प्रतिष्ठान व कर्जत तालुका क्रीडा शिक्षक समिती यांना या स्पर्धेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भव्य प्रेक्षक गॅलरी उभारली आहे. तेथे दहा हजार प्रेक्षक बसू शकतील. या क्रीडा नगरीमुळे कर्जतच्या वैभवात भर पडली आहे. स्पर्धेसाठी येणा-या खेळाडंची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी आढावा बैठक घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत व त्यांचे सर्व सहकारी, शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक, क्रीडा विभागाचे अधिकारी हे अहोरात्र परिश्रम घेत आहेत. विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या स्पर्धेत राज्यातील ३२ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा रसिकांना खेळ पाहण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सज्ज असलेल्या कर्जत येथील श्री सदगुरू गोदड महाराज क्रीडानगरी येथे एकावेळी चार सामने दिवस-रात्र होणार आहेत.
कर्जतला गुरुवारपासून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : विनोद तावडेंच्या हस्ते उद्घाटन; समारोपाला मुख्यमंत्री येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 7:16 PM