जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा पराभव केला.येथील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रोहित पवार हे आघाडीवर होते. पुढे ही आघाडी वाढत गेली. प्रचारादरम्यान दोघांनीही मतदारसंघ पिंजून काढला होता. येथे शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले यांच्या सभा झाल्या होत्या. तर रोहित पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांनी सभा घेतल्या होत्या. याशिवाय रोहित पवार हे बाहेरचे पार्सल मागे पाठवा, असे मुख्यमंत्री प्रचारादरम्यान म्हटले होते. त्यामुळेही या मतदारसंघाची चर्चा झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु मतदारांनी रोहित पवार यांच्या बाजूने कौल दिला आहे. विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
कर्जत-जामखेड मतदारसंघ निवडणूक निकाल : रोहित पवार विजयी; पालकमंत्री राम शिंदे यांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 16:21 IST