कर्जत : कर्जत तालुका कृषी विभाग व ‘आत्मा’च्या वतीने कर्जत तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नागपूर येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या अभ्यास दौऱ्यात ३० शेतकरी सहभागी झाले होते. ४ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात यावेळी शेतकऱ्यांनी नागपूर येथील राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्राला व काटोल येथील प्रादेशिक फळपीक संशोधन केंद्राची पाहणी करून तेथे सखोल माहिती घेतली. कृषी क्षेत्रातील नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, अधिक उत्पादन देणाऱ्या लिंबू तसेच इतर फळांच्या जाती, फळांची गुणवत्ता, पाणी व फळबाग व्यवस्थापन तसेच तेथील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास केला.
राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्रात रुंद गादी पद्धतीने लिंबू, संत्री, मोसंबी आदी फळपिकांची २५० एकरांवर करण्यात आलेल्या लागवडीची पाहणी करून माहिती जाणून घेतली.
यावेळी फलोत्पादन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोनकर यांनी माहिती दिली. यावेळी साई सरबत्ती, एन.आर.सी.सी-८, बालाजी, पी.के.एम.-१ तसेच संत्र्याचेही देशी व परदेशी वाण, मोसंबीचे विविध वाण, फळांचे प्रकार, वनातील फरक, उत्पादकता, बाजारपेठ याविषयी शेतकऱ्यांनी माहिती घेतली. रोगमुक्त, विषाणूमुक्त लिंबू रोपांची निर्मिती, रोपांचे विविध खुंटावरील परिणाम, खत व पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण आदी विषयांचा सामावेश होता.