कुळधरण : कर्जत तालुक्यातील असलेल्या कुळधरण गावच्या प्रगतीच्या व दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कर्जत-कुळधरण-श्रीगोंदा राज्यमार्गाच्या मजबुतीकरणाचे व डांबरीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे.या रस्त्यांचे काम पूर्ण होणार कधी? असा संतप्त सवाल वडगाव, दूरगाव व कुळधरण परिसरातील नागरिकांमधून विचारला जात आहे. कर्जत- कुळधरण हा राज्यमार्ग कर्जत व श्रीगोंदा या दोन तालुक्यांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. पण याच रस्त्यावर कर्जत ते कुळधरणपर्यंत मोठमोठे खड्डे पडले असल्याने सध्या हा खड्डयाचा मार्ग म्हणून प्रसिद्ध झाला आहे. वाहनधारकांना खड्डे पडलेल्या मार्गावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या पंधरवडयापासून कर्जत ते कुळधरण असे एकूण सतरा किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याच्या कडेला खडीचे ढिग टाकून ठेवले आहेत. हे ढिग वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत असून अनेकदा अपघात घडत आहेत. तसेच खडीच्या ढिगांमुळे हा रस्ता अवजड वाहनांसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या कडेला खडीचे ढिग टाकले असल्याने वाहनांच्या टायरखाली दगडी खडी सापडून त्यावरून वाहने निसटून अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. याशिवाय रस्त्याच्या साईडपट्टयांचे काम होणे अपेक्षित आहे. मात्र या रस्त्याला साईडपट्टया नसल्याने वाहनचालक, प्रवासी, दुचाकीस्वार व पादचारी यांना येथून प्रवास करणे अवघड बनले आहे.या राज्यमार्गाचे डांबरीकरण व मजबुतीकरणाचे काम चालू वर्षातील पावसाळा सुरू होण्यापूर्वी अपेक्षित होते. पण आता पावसाळा जवळ आला तरीही या रस्त्याचे काम रखडले आहे. सरकारी नियमानुसार पावसाळ्यात डांबरीकरण करता आले नाही तरी खडीकरण व मुरूमीकरणाचे काम तातडीने पूर्ण करून पावसाळा संपल्यावर डांबरीकरणासह उर्वरित काम हाती घ्यावे, अशी मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.