अहमदनगर : हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर पहिल्याच दिवशी शुक्रवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. परंतु केवळ दक्षिण जिल्ह्यातील तालुक्यांवरच त्याची कृपादृष्टी दिसली. उत्तरेतील तालुके व धरणांचे पाणलोटक्षेत्र मात्र कोरडेच होते. राशीन येथे सर्वाधिक १०७ मिलीमिटर पाऊस नोंदवला गेला.दि. ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री व पहाटपासून नगरसह दक्षिणेतील तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. कर्जत तालुक्यात ६० ते ७० मिमी पाऊस झाल्याने वालवड येथील रस्ता खचला. राशीन मंडळात सर्वाधिक १०७ मिमी पावसाची नोंद झाली. या मंडळातील करपडी, परिटवाडी, बाभळगाव, मानेवाडी येथील ओढ्यांना पूर आल्याने त्या गावांचा संपर्क तुटला. श्रीगोंदा येथेही मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. जामखेड येथे रात्री दीडपासून पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे रात्री गायब झालेला वीजपुरवठा सकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता.नगर शहर व तालुक्यात रात्रभर रिमझिम सुरू होती. राहुरी, श्रीरामपूर, पारनेर येथेही पावसाला फार जोर नव्हता. शेवगाव, पाथर्डी, नेवासा या तालुक्यांतही २० ते ५० मिमीपर्यंत पाऊस झाला.धरणांत आवक थांबलीअकोले, कोपरगाव, राहाता, संगमनेर या उत्तरेकडील तालुक्यांत पावसाने पाठ फिरवली. येथे शून्य मिमी पावसाची नोंद होती. विशेष म्हणजे अकोल्यासारख्या सर्वाधिक पावसाच्या तालुक्यातही थेंब नव्हता. त्यामुळे मुळा, भंडारदरा, निळवंडे या धरणांत नवीन पाण्याची आवक झाली नाही.
कर्जत, राशीन, श्रीगोंदा, शेवगावला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 11:54 AM