कर्जत : कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाला ८० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळाले आहेत. याद्वारे हवा-पाण्यातून ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यातील ७० बारामती ॲग्रोने तर विविध सामाजिक संघटनांनी दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. यामुळे येथील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
नावीन्यपूर्ण व प्रभावी उपाययोजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी रोहित पवार सध्या कार्यरत आहेत. त्याअंतर्गत बारामती ॲग्रोने ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मदत म्हणून दिले आहे. ही ७० उपकरणे आमदार रोहित पवार यांनी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केली.
विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उप जिल्हा रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आली आहेत. यामुळे उपजिल्हा रुग्णालयाकडे ८० उपकरणे उपलब्ध झाल्या आहेत. याचा लाभ कोरोना रुग्णांना होणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीतील ऑक्सिजन थेरपीसाठी कॉन्सन्ट्रेटर यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे ही उपकरणे सध्या सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने परदेशातून मागविण्यात आली आहेत.
यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गट विकास अधिकारी अमोल जाधव आदी उपस्थित होते.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. एकावेळी पाच लिटर ऑक्सिजन साठविण्याची क्षमता असल्याने याचा फायदा गरज असलेल्या कोरोना रुग्णांना तत्काळ होणार आहे.
--
मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिक व सामाजिक संस्था पुढे येत आहेत. याचा मला निश्चित आनंद आहे. आता पुढील काळातही आणखी काही 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर'ची मदत होणार आहे. मदतीसाठी सरसावलेल्या सर्वांचे आभार.
-रोहित पवार,
सदस्य, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ
---
०२ कर्जत पवार
आमदार रोहित पवार यांनी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुपूर्द केले.