अहमदनगर : कर्नाटक राज्यातून आणलेला ६३ किलो गांजा भिंगार कॅम्प पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील नगर-सोलापूर रोडवरील भिंगार नाला पुलाजवळ नाकाबंदी करून पडला. यावेळी दोन आरोपींसह ११ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांना जामखेड रोडने एका इंडिका कारमधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार भिंगार पोलीस ठाण्याचे प्रभारी निरिक्षक कैलास देशमाने यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी भिंगार नाला येथे सापळा लावला. सोलापूर रोडने शहराच्या दिशेने एक इंडिका व्हिस्टा कार येत होती़ पोलिसांनी कार थांबवून तपासणी केली असता बॉक्समध्ये गांजा लपवून ठेवल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी सादिक सुभान शेख (वय २५ रा. केडगाव) व आशिष अरुण आडेप (रा. चितळे) यांना अटक केली. यावेळी ७ लाख रुपयांचा ६३ किलो गांजा, चार लाख रुपयांची एक कार व दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. हा गांजा कर्नाटक येथून आणून नगर शहरात विकण्यात येणार होता.सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कैलास देशमाने, नायब तहसीलदार अर्चना पागिरे, कामगार तलाठी भाऊसाहेब पवार, सहाय्यक निरिक्षक श्रीधर गुट्टे, सहायक फौजदार गायकवाड, गजानन करेवाड, कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, राजेंद्र सुद्रिक, ज्ञानेश्वर शिंदे, पोटे, बोरुडे, कर्डक, शेख, कारखिले, बनकर, गोसावी, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.