श्रीरामपूर : कर्नाटक राज्यात सोने चोरीच्या घटनेत पकडलेल्या आरोपी जाकीर हुसेन युसुफ खान (रा. इराणी गल्ली, श्रीरामपूर) याने शहरातील सराफाला सोने विकले. सोने घेणाऱ्या सराफाला कर्नाटक पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले.
श्रीरामपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आरोपी खान यास सराफ गल्लीत घेऊन आल्यावर त्याने दुकानदाराचे नाव सांगितले. मात्र आरोपीने प्रथम अन्य एका निरपराध सराफाचे नाव सांगितले होते. त्यामुळे गोंधळ उडाला. आरोपी खान व त्याच्या साथीदारांनी पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करत २०१८-१९ मध्ये कर्नाटक राज्यात सोने लुटीचे गुन्हे केले. उडपी पोलीस ठाण्यात तीन तर कुंदापुर पोलीस ठाण्यात खान विरुध्द जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
रस्ता लुटीत पोलीस अधिकारी असल्याचे सांगून खान हा दम देत असे. नंतर त्यांच्याकडील दागिने ताब्यात घेऊन फरार होत असत असे कनार्टक पोलिसांचे म्हणणे आहे.