राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक अनिल यशवंतराव कासार यांची बिनविरोध निवड झाली. नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनिता दशरथ पोपळघट यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पदाचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा मंजूर झाल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली.
सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमुळे सभेस उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, प्रकाश भुजाडी, अशोक आहेर, मयुर चुत्तर व मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे हे उपस्थित होते, तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे इतर सर्व नगरसेवक उपस्थित होते. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिवशी प्रभाग ४मधून निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक अनिल कासार यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे कासार यांच्या निवडीची घोषणा होणे, ही औपचारिकता होती. कासार यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल पवार यांनी घोषित केले. प्रांताधिकारी अनिल पवार, उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष कासार यांचा सत्कार केला. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष, माजी खासदार प्रसाद तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे व ओजस्विनी पतसंस्थेच्या संस्थापक सुजाता तनपुरे यांनी कासार यांच्या निवडीबद्दल स्वागत केले.