अहमदनगर : काटवन खंडोबा ते आगरकर मळा या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. याचा शालेय विद्यार्थी, रुग्णांना या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागतो. महापालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा नगरसेवकांना विसर पडल्याचे या परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.आयुर्वेद चौकाच्या उजव्या बाजूने काटवन खंडोबा रोड कमान ते आगरकर मळा स्वीट कॉर्नर हा आता वर्दळीचा रस्ता झाला आहे. सीना नदीच्या पुलावरून ते संजयनगर झोपडपट्टी ते आगरकर मळा असा हा रस्ता जातो.दहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले. त्यानंतर इथे रस्ताच झाला नाही. सध्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. सीना नदीच्या पुलावरही खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांमधील पाणी रस्त्यावर आलेले आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी चिखल झालेला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून जात असल्याने रस्ता खराब झाला आहे. रात्रीच्यावेळी तर या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे़ खराब रस्त्यामुळे येथे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे़ दोनवेळी महापालिका निवडणुकीत अनेकांनी आश्वासने दिली, मात्र रस्त्याचे काम झाले नाही, नेते येतात आणि केवळ आश्वासने देऊन जातात प्रत्यक्षात पाठपुरावा कुणाकडूनही होत नाही़ असे येथील नागरिक सांगतात.सदरचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. सिमेंट काँक्रिटचे काम ३० लाख रुपये खर्चाचे आहे. आचारसंहितेचे कारण देऊन अद्याप या रस्त्याचा निर्णय झालेला नाही.सभापती असताना रस्त्याचे काम हाती घेतले होते. मात्र त्यासाठी महापालिकेत निधी उपलब्ध झाला नाही. रस्त्याचे मजबुतीकरण, काँक्रिटीकरण, रुंदीकरण यासह रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे यासह मॉडेल रस्ता करण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या रस्त्यासाठी महापालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा, याबाबत खासदार डॉ. सुजय विखे यांनाही निवेदन दिले आहे. -सुवर्णा जाधव, माजी सभापतीआगरकामळा ते आयुर्वेद चौकापर्यंत येण्या-जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधींचे तर या रस्त्याकडे अजिबात लक्ष नाही. याशिवाय महापालिका प्रशासन या रस्त्यांकडे लक्ष देत नाही. महत्वाच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध होत नाही की प्रशासन निष्काळजीपणा करते आहे, हेच कळत नाही. काम करण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची शहराला खरी गरज आहे. -गीतांजली काळे, माजी उपमहापौरकाटवन खंडोबा रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे. नऊ मीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र सध्या साडेचार फूट रस्ताही उपलब्ध नाही. रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे अत्यंत गरजेचे आहे.-शाकीर शेख, नागरिकरस्ता चांगला होणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी, रुग्णांना या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास होतो. शहराजवळचा हा सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे. रस्ता मंजूर झाला, तर काम का होत नाही, असा प्रश्न आहे. महापालिकेने चांगला रस्ता तयार करण्यासाठी कार्यवाही करावी.-सिद्धांत जाधव, युवक कार्यकर्ता
काटवन खंडोबा रस्त्याचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 4:10 PM