बोधेगाव : शेवगाव - पाथर्डी तालुक्यातील सर्वसामान्य कोरोनाग्रस्त रूग्णांना दिलासा देण्यासाठी केदारेश्वर कारखान्याने अडचणीच्या काळात सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला. स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती संकटात असताना देखील ऋषिकेश ढाकणे यांनी अतिशय जबाबदारीने दोन कोविड सेंटर उभे केले. केदारेश्वरचे हे सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याच्या भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील केदारेश्वर साखर कारखाना येथील २०० बेड क्षमतेच्या कोविड सेंटरमधील प्राथमिक मान्यता मिळालेल्या ५० बेडचे बुधवारी (दि. २१) लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अस्थिरोग तज्ज्ञ डाॅ. विक्रांत घनवट होते. सुळे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष डाॅ. प्रकाश घनवट, नायब तहसीलदार मयूर बेरड, डाॅ. प्रमोद जाधव, डाॅ. दीपक जैन, डाॅ. चंद्रशेखर घनवट, ज्येष्ठ संचालक सुरेशचंद्र होळकर, रणजित घुगे, बापूसाहेब घोडके, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, मुख्य लेखापाल तीर्थराज घुंगरट, ग्रामविकास अधिकारी राजाराम काटे, तलाठी अमर शेंडे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्ष डाॅ. घनवट म्हणाले, केदारेश्वरचे संस्थापक अध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्या प्रेरणेने व अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे, तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड सेंटर उभारले आहे. कोरोना बाधित रूग्णांसाठी याठिकाणी सर्व सुविधा विनाशुल्क मिळणार आहेत. नायब तहसीलदार बेरड यांनी केदारेश्वरच्या कार्याचे कौतुक करत प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक संचालक माधवराव काटे यांनी केले. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले व प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
-----
कोरोनाग्रस्तांसाठी मोफत सुविधा..
केदारेश्वर कारखाना येथील काॅलनीमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आलेले आहे. याठिकाणी गादी, खाट, पंखा, स्वतंत्र बाथरूम आदींची सोय केलेली आहे. रूग्णांना दोन वेळचे पोषक जेवण, नाश्ता, चहा व शुद्ध पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच औषधोपचार विनाशुल्क मिळणार आहेत.
---
२१ बोधेगाव
बोधेगाव येथील केदारेश्वर कोविड सेंटरचे लोकार्पण करताना कारखान्याचे उपाध्यक्ष डाॅ. प्रकाश घनवट, डाॅ. विक्रांत घनवट, डाॅ. प्रमोद जाधव, नायब तहसीलदार मयूर बेरड व इतर.